लखनौत 'मशीद - ए- अमन' बांधा
अयोध्याप्रश्नी शिया वक्फ बोर्डाचा प्रस्ताव
लखनौ : अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात आपला प्रस्ताव सादर केला असून, त्यात अयोध्येऐवजी लखनौत 'मशीद - ए- अमन' बांधावी, असे सुचविले आहे. अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यास हरकत नसल्याचेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
अयोध्या प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने शिया वक्फ बोर्डाने प्रस्ताव बनविला असून, तो सर्वोच्च न्यायालयात 18 नोव्हेंबरला सादर करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष वासीम रिझवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरीदेखील उपस्थित होते.
रिझवी म्हणाले, ''बाबरी मशिदीच्या देखभालीची जबाबदारी शिया वक्फ बोर्डाकडे होती. अयोध्येतील जागेवरचा दावा सोडण्याची तयारी या प्रस्तावात दाखविण्यात आली आहे. शिया बोर्डाने सादर केलेला प्रस्ताव यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सादर केलेला उत्तम प्रस्ताव आहे. अयोध्येऐवजी लखनौमधील हुसेनाबाद परिसरात 'मशीद - ए- अमन' बांधावी, असे बोर्डाचे मत आहे. त्यासाठी एक एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे. अयोध्या ही मंदिरांची जागा असून, तेथे मशिदीची गरज नाही.''
अयोध्येतील विवादीत जागेवरील उत्तर प्रदेश केंद्रीय सुन्नी वक्फ बोर्डाच्या दाव्याबाबत बोलताना रिझवी म्हणाले,''अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने सप्टेंबर 2010 मधील आपल्या निर्णयात एक तृतीयांश जागा मुस्लिमांसाठी दिली आहे. ती सुन्नी वक्फ बोर्डासाठी दिलेली नाही.''
या वेळी महंत नरेंद्र गिरी म्हणाले,''या प्रकरणावरील शिया वक्फ बोर्डाची भूमिका कधीही ठोसपणे मांडली गेली नाही; कारण यासाठी नियुक्त केलेले वकील हे बनावट होते.''
यावर रिझवी म्हणाले,''या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या वकिलांना बोर्डाने वकालतनामा दिलेला नव्हता, असे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारने चौकशीचा आदेश द्यावा. अयोध्या वादात शिया बोर्ड उशिरा कार्यरत झाला, असा आरोप होतो; पण आमच्या बाजूने कोर्टात कोण वकील दिला आहे हेच आम्हाला ठाऊक नव्हते. बोर्डाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी वकिलांची कोणी नियुक्ती केली, याची सरकारने चौकशी करावी. कारण या वकिलांनी बोर्डाची बाजू योग्य रीतीने मांडली नाही.''
महंत गिरी म्हणाले,''अयोध्येत राममंदिर बांधण्यात येईल. सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतरच यावर सर्वमान्य तोडगा निघेल.''





COMMENTS